Khargone Violence : खरगोनमध्ये अद्यापही कर्फ्यू सुरूच, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालल्यानं ओवेसी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:57 AM2022-04-12T10:57:31+5:302022-04-12T10:58:13+5:30
"सत्तेच्या नशेत गरिबांची घरं उद्धवस्त केली जात आहेत. आज त्यांचे सरकार आहे, पण उद्या नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे."
मध्य प्रदेशातील खरगोन येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार झाला. यावरू आता राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. या घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्यावर निशाणा साधला आहे.
ओवेसी म्हणाले, मध्य प्रदेशात कायद्याच्या शासन व्यवस्थेपेक्षाही जमाव वरचढ झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची विचारधारा भलेही मशिदींचे विटंबन करणारी आणि ज्येष्ठांवरील हल्ल्यांना योग्य ठरवणारी असेल. पण ते घटनात्मक पदावर आहेत, हे त्यांनी विसरायला नको. जनतेचा जीविताचे आणि मालमत्तेचे संक्षण करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. एवढेच नाही, तर सत्तेच्या नशेत गरिबांची घरं उद्धवस्त केली जात आहेत. आज त्यांचे सरकार आहे, पण उद्या नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
गेल्या 10 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त खरगोन येथे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी काही लोकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केली. यामुळे परिसरात हिंसाचार सुरू झाला. एवढेच नाही, तर यावेळी काही लोकांनी पेट्रोल बॉम्बदेखील फेकले. या संपूर्ण घटनेत सर्वसामान्यांसह 20 पोलीसही जखमी झाले होते.
मध्य प्रदेशात 2023 मध्ये निवडणुका -
रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर मध्य प्रदेश सरकार अॅक्शनमध्ये आले आणि जिल्हा प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या घरावर थेट बुलडोझर चालवले. यानंतर ही कारवाई एकतर्फी असल्याचे म्हणत, ओवेसी यांनी शिवराज सिंह सरकारवर निशाणा साधला आहे. पुढच्या वर्षी, म्हणजेच 2023 मध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि असदुद्दीन ओवेसीही या निवडणुकीत भाग्य आजमावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. खरे तर, मध्यप्रदेशातील निवडणुकीसंदर्भात त्यांच्या पक्षाकडून यापूर्वी अनेक वेळा भाष्य करण्यात आले आहे.