नवी दिल्ली - नागालँड निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या घडामोडीचे आता देशात पडसाद उमटू लागले आहेत. या निकालानंतर गरज नसतानाही NCP प्रमुख शरद पवार यांनी भाजपा प्रणित आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे MIM प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले आहेत. त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठांनी सांगितले आहे. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयावरून राजकीय टीका सुरू झाली आहे. याबाबत खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जर शरद शादाब असते तर त्यांनाही बी टीम म्हटलं असते. 'सेक्युलर' साठी अस्पृश्य मानले गेले असते. मी कधीही भाजपा सरकारला पाठिंबा दिला नाही आणि देणारही नाही. परंतु दुसऱ्यांदा NCP ने भाजपाला पाठिंबा दिला आहे आणि हे शेवटचे असू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला.
तसेच साहेब, त्यांचे मंत्री नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचे समर्थन करतात असा टोलाही ओवैसींनी शरद पवारांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांच्या निवेदनानंतर ओवैसींनी ही टीका केली आहे. शरद पवार यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने हा निर्णय स्थानिक पदाधिकारी आणि नवनियुक्त आमदार यांच्या मतानंतर घेतला आहे. या निवेदनात भाजपाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही.
नेफ्यू रियो यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये भाजपाचे ५ तर एनडीपीपीचे ७ मंत्री आहेत. नागालँड निवडणुकीत रियो यांच्या नेतृत्वात एनडीपीपी भाजपा युतीने विजय मिळवला. रियो यांनी २०१८ मघ्ये भाजपाशी आघाडी केली. मागील निवडणुकीत या आघाडीने ३० जागांवर विजय मिळवला होता. तर यंदाच्या निवडणुकीत ३७ जागांवर विजय पटकावला. भाजपाने या निवडणुकीत २० जागांवर तर एनडीपीपीने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात भाजपाने १२ आणि एनडीपीपीने २५ जागांवर विजय मिळवला आहे.