Owaisi vs Yogi Adityanath: AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशातील कावडियांवर पुष्पवृष्टी केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला. ओवेसी यांनी भाजपावर भेदभावाचा आरोप केला. त्यावेळी आमच्यावर फुलांचा वर्षाव केला नाहीत तरी चालेल, पण किमान आमच्या घरांवर बुलडोझर चालवू नका, असा खोचक टोला त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला लगावला.
संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना ओवेसी म्हणाले, "सर्व समुदायांना समान वागणूक दिली गेली पाहिजे. पण भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार जनतेचा पैसा वापरून कावडियांवर फुलांचा वर्षाव करत आहे. त्यांनी सर्वांना समान वागणूक द्यावी अशी आमची इच्छा आहे. ते आमच्यावर (मुस्लिम) फुलांचा वर्षाव करत नाहीत. त्याऐवजी ते आमच्या घरांवर बुलडोझर चालवतात. आमच्यावर फुलांचा वर्षाव नाही केला तरी चालेल पण आमच्या घरांवर बुलडोझर तरी चालवू नका."
त्याचवेळी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओवेसी म्हणाले की, रामपूरमधील मुस्लिम मुलाचे काय झाले, प्रयागराजमध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर घर होते, ते पाडण्यात आले. नुसत्या संशयावरून एखाद्याचे घर कसे तोडले जाऊ शकते? तुम्ही विशिष्ट घरांना अभय देता आणि आमची घरं तोडता. जर तुम्ही एका समाजावर प्रेम करत असाल, तर तुम्ही दुसऱ्या समाजाचा द्वेष करू शकत नाही. या आधी मंगळवारी ओवेसी यांनी कावड यात्रेशी संबंधित अनेक बातम्या ट्विटरवर शेअर केल्या होत्या आणि म्हटले होते की, एखाद्या मुस्लिम माणसाने मोकळ्या जागेत काही मिनिटांसाठीही नमाज अदा केली तर वाद होतो. मुस्लिम आहेत म्हणून पोलिसांच्या गोळ्या आणि इतर त्रास सहन करावा लागतो.