asaduddin Owaisi On UCC : सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी 'समान नागरी कायदा' हा मुद्दा आहे. या कायद्याला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुरूवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. जर हा कायदा लागू झाल्यास याचा सर्वाधिक त्रास हिंदू बांधवांना होईल, असे म्हणत ओवेसींनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, समान नागरी कायदा लागू झाल्यास हिंदू बांधवांचे अनेक अधिकार काढून घेतले जातील, ज्यात विवाह कायदा तसेच अनेक सामाजिक आणि धार्मिक प्रथांचा समावेश आहे. ओवेसी यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये हिंदूंना दिलेल्या विशेषाधिकारांचा उल्लेख केला आहे. तसेच कायदा लागू झाल्यास हिंदूंचे हे अधिकार काढून घेतले जातील असा दावा त्यांनी केला आहे.
...तर पारंपारिक रीतिरिवाजानुसार लग्न करता येणार नाहीदरम्यान, हिंदू विवाह कायदा, १९५५ चा हवाला देत ओवेसी यांनी म्हटले, "या कायद्यात हिंदू बांधवांसाठी वडिलांच्या सात पिढ्या आणि आईच्या पाच पिढ्यांपर्यंत लग्न होऊ शकत नाही, असे म्हटले आहे, परंतु याला अपवाद देण्यात आला आहे. पण समान नागरी कायदा आल्यास हा अपवाद संपेल." तसेच हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ मध्ये असे नमूद आहे की, तुम्ही तुमचे लग्न तुमच्या पारंपारिक रीतिरिवाजानुसार करू शकता परंतु हा कायदा आल्यास ते करता येणार नाही, असेही ओवेसींनी सांगितले. याशिवाय हिंदू विवाह कायद्याच्या कलम २ च्या उपकलमचा संदर्भ देत ओवेसींनी सांगितले की, हिंदू विवाह कायदा अनुसूचित जमातींना लागू होणार नाही, परंतु समान नागरी कायदा आल्यास या बांधवांचा देखील अधिकार हिरावून घेतला जाईल.
हिंदू बांधवांचे नुकसान - ओवेसी "फक्त हिंदू बांधवांना अशी सुविधा देण्यात आली आहे की, त्यांनी जर संयुक्त कुटुंबात राहून व्यवसाय सुरू केल्यास त्यांना करात सूट मिळेल, मात्र समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेतला जाईल. २०१५ ची आकडेवारी पाहिली तर या कायद्यामुळे हिंदू बांधवांना ३०६५ कोटी रूपयांच्या करात सूट मिळाली होती. तर, पाल्याला दत्तक घेतल्यावर देखील हिंदूंना करात सूट मिळाली", असा दावा ओवेसी यांनी केला आहे.
RSS वर साधला निशाणासमान नागरी कायदा लागू केल्यास मुस्लिमांचे नुकसान होईल असे वातावरण तयार केले जात आहे. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा विचार करत असेल की, यामुळे केवळ मुल्लाजींच्या लोकांना लक्ष्य केले जाईल, तर तुम्ही आमच्या नावावर इतरांचे नुकसान करत आहात, अशी टीका ओवेसींनी केली.