मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची अँटिग्वामध्ये जाऊन चौकशी करण्यास अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्ट नकार देताना, त्याला एअर अॅम्ब्युलन्समधून आणण्याची तयारी दर्शविली.चोक्सीची प्रकृती ठीक नसल्याने तो भारतात चौकशीसाठी येऊ शकत नसेल, तर आम्ही त्याला एअर अॅम्ब्युलन्सने आणू. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असतील, असेही ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ईडीने पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रक्रियेला स्थगित मिळावी, यासाठी चोक्सीने उच्च न्यायालयात दोन याचिका केल्या आहेत. त्यावरील प्रतिज्ञापत्रात चोक्सीने मी फरार नसून प्रकृतीच्या कारणास्तव अँटीग्वामध्ये असून, भारतात येऊ शकत नाही. तपास यंत्रणेला अँटिग्वामध्ये चौकशीसाठी सहकार्य करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. या प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना ईडीने चोक्सीचे सर्व दावे फेटाळले.आपली ६,१२९ कोटींची संपत्ती जप्त केल्याचा चोक्सीचा दावा न्यायालयात ईडीने फेटाळला आहे. चोक्सीची २१०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे आणि देश सोडून जाण्यापूर्वी चोक्सीने ती विकण्याचा प्रयत्न केला होता, असे ईडीने म्हटले आहे.‘चोक्सीने तपासात कधीच सहकार्य केले नाही. विशेष न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली. मात्र, त्याने भारतात परतण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी विनंती ईडीने न्यायालयाला केली आहे. ईडी १३,००० कोटी रुपये पीनएबी घोटाळयाचा तपास करत आहे. या प्रकरणात मेहुल चोक्सीचा भाचा नीरव मोदी मुख्य आरोपी आहे.
एअर अॅम्ब्युलन्सने चोक्सीला भारतात आणू - ईडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 7:38 AM