लखनऊ - विमानाचे आकारमान लक्षात घेता लँडिंग आणि उड्डाणासाठी मोकळया जागेची धावपट्टीची गरज असते. पण येत्या 24 ऑक्टोंबरला भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने उत्तर प्रदेशच्या आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वरुन लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत. मागच्यावर्षीही एक्सप्रेस वे वर अशा प्रकारचा युद्धसराव केला होता. यावर्षी ट्रान्सपोर्ट विमान (एएन 32) एक्सप्रेस वे वरुन लँडिंग आणि उड्डाण करणार आहे.
यावर्षी हवाई दलाची एकूण 20 विमाने एक्सप्रेस वे वरुन लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत. या सरावासाठी आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे च्या काही भागामध्ये 20 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वर उन्नाव जिल्ह्याजवळ एअर स्ट्रिप आहे. तिथे लढाऊ विमाने लँडिंग आणि उड्डाणाचा सराव करणार आहेत.
मिराज 2000, जॅगवार, सुखोई 30 आणि एएन-32 ही विमाने एक्सप्रेस व लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत. 24 ऑक्टोंबरच्या सकाळी 10 वाजल्यापासून हा सराव सुरु होईल. मागच्यावर्षीही याच एक्सप्रेस वे वर विमानांनी उड्डाण आणि लँडिंगचा सराव केला होता. यावर्षाचे वैशिष्टय म्हणजे प्रथमच ट्रान्सपोर्ट विमान एक्सप्रेस वे वर लँडिंग करुन पुन्हा उड्डाण करणार आहे. मागच्यावर्षी आठ लढाऊ विमाने इथे उतरली होती. आपातकालीन परिस्थिती रस्त्यावर विमान उतरवण्याची वेळ आल्यास त्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी या एक्सप्रेस वे ची निवड करण्यात आली आहे.