पुणे : भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला (पीआयओ) दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. पीआयओच्या महिला हेराला प्रदीप कुरूलकर याने ब्लॉक केल्यानंतर त्याला दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून ‘मला का ब्लॉक केले? असा मेसेज आला. हा मेसेज हवाई दलातील एका अधिकाऱ्याच्या मोबाइलवरून आल्याचे निष्पन्न झाले असून तोही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती आहे.
निखिल शेंडे (वय ३२) असे या हवाई दलातील अधिकाऱ्याचे नाव आहे. शेंडे हा सध्या बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. कुरूलकर याच्याप्रमाणेच शेंडे हादेखील पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे.
- याप्रकरणी निखिल शेंडे याचा मोबाइल तपास अधिकाऱ्यांनी जप्त करण्यासाठी हातात घेतला असतानाच त्या मोबाइलवरच एका महिलेचा फोन आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. - फोरेन्सिक अहवालात नेमका हा फोन कोणत्या महिलेचा होता हे स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शेंडेची काेर्ट इन्क्वायरी सुरू -- एटीएसच्या पथकाकडून शेंडे याची चौकशी केली असता तोही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. - भारतीय वायुसेनेच्या गुप्तचर पथकाकडून शेंडे याची कोर्ट इन्क्वायरी सुरू असून, मुंबई एटीएसने शेंडेचा जबाब नोंदविल्याचे सांगण्यात आले आहे.
कुरुलकरला आला मेसेज, क्रमांक निघाला नागपूरचा- कुरूलकरकडे एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची महिला हेर झारदास गुप्ता हिचा मोबाइल क्रमांक कुरूलकरने ब्लॉक केला. त्यानंतर कुरूलकरला दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून ‘मला का ब्लॉक केले’? असा मेसेज आला. - एटीएसने याचा एसडीआर प्राप्त केला असता तो नागपूरच्या एका व्यक्तीचा प्रीप्रेड मोबाइल क्रमांक असल्याचे कळाले. त्याबाबत नागपूर युनिट प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मोबाइल क्रमांक हा निखिल शेंडे या हवाई दलातील अधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शेंडेचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे.
कुरुलकरच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ‘डीआरडीओ’मधील संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याकडून जप्त केलेला मोबाइल न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून सोमवारी प्राप्त झाला. त्या मोबाइलचे विश्लेषण करायचे आहे, असे सांगून सरकारी वकिलांनी एक दिवसाची पोलिस कोठडी देण्याची मागणी सोमवारी विशेष न्यायालयाकडे केली. त्यानुसार कोर्टाने कुरुलकरची पोलिस कोठडी एक दिवसाने वाढविली आहे.