नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या गोल्डन ॲरोज तुकडीत (स्क्वॉड्रन) १६ ओम्नी रोल राफेल जेट लढाऊ विमाने येत्या एप्रिलमध्ये दाखल झाल्यावर दलाच्या मारक क्षमतेला बळ मिळेल. याशिवाय फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन निर्माती सॅफ्रॅन लढाऊ विमानांची इंजिने आणि दुय्यम भाग भारतात बनवण्यास तयार आहे, असे या विषयाशी संबंधित लोकांनी मंगळवारी सांगितले. पाच राफेल जेट विमाने गेल्या २९ जुलै रोजी अबुधाबीमार्गे अंबाला हवाई तळावर आली आणि ती भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रन १७ मध्ये सामावून घेण्यात आली आहेत. तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी पाच नोव्हेंबर रोजी अंबालात दाखल होईल ती थेट बोर्डिओक्स-मेरिग्नॅक केंद्रावरून. या विमानांचा प्रवासात कुठेही थांबा नसेल कारण हवेत असताना त्यांच्यात इंधन भरले जाईल, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत. येत्या जानेवारी महिन्यात आणखी तीन राफेल विमाने येतील. त्यानंतर मार्च महिन्यात तीन व एप्रिलमध्ये सात विमाने दाखल होतील, अशी एकूण २१ एक आसनी व दोन आसनी सात ट्रेनर फायटर्स लढावू विमाने भारतीय हवाई दलाला सुपूर्द केली जातील.
भारतीय हवाई दलात एप्रिलमध्ये येणार १६ राफेल जेट विमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 5:09 AM