नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ३ जून रोजी कोसळलेल्या मालवाहू विमानाच्या अवशेषाचा काही भाग अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे सांगण्यात आले. हे विमान आसामच्या जोरहाटहून अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या लष्करी तळाकडे निघाले होते.या विमानात ८ कर्मचारी व ५ प्रवासी, असे १३ जण होते. एका आठवड्यानंतर विमानाचे अवशेष सापडल्याने त्यातील कर्मचारी जिवंत असण्याची शक्यता कमी आहे. अर्थात अवशेष व कर्मचारी यांचा बारकाईने शोध घेण्यात येत आहे. हे विमान कशामुळे कोसळले, याचाही आता तपास करण्यात येईल. हे विमान ३ जून रोजी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते; पण दुपारी एक वाजण्याच्या सुमारात त्याचा संपर्क तुटला.या विमानाचे अवशेष पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे हवाई दलाने टष्ट्वीटद्वारे कळविले आहे. हे रशियन बनावटीचे अँटोनोव एएन-३२ जातीचे विमान असून, यापूर्वीही अशा विमानांना अपघात झाले आहेत. या विमानाचा संपर्क तुटताच हवाई दलाने सर्वत्र शोध सुरू केला होता. त्यात नौदल, तसेच लष्कराचे जवान व इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सचे पोलीसही मदत करीतहोते.
हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 8:42 AM