ऑनलाइन लोकमत
तेजपूर, दि. 26 - भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई एसयू 30 जेट फायटरबाबत माहिती मिळाली असून त्याचा अपघात झाला आहे. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या दिमतीत असलेल्या अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी एक विमान आसामधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून बेपत्ता झाले होते. मंगळवारी नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात सुखोई एसयू 30 जेट फायटर विमान बेपत्ता झाले होते. आसाममधील तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटल्याची माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली होती.
हे विमान नियमित सरावासाठी गेले असताना बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास आसाममधील तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई एसयू30 जेट फायटरने दोन वैमानिकांसह नेहमीप्रमाणे उड्डाण केले. त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. सुखोई एसयू 30 सकाळी 11.30 च्या सुमारासतेजपूरच्या उत्तरेस 60 किमी अंतरावर असर्ताना त्याच्या वैमानिकांशी अखेरचा संपर्क झाला होता. तेजपूर हवाई अड्डा चिनी सीमारेषेपासून 172 किमी अंतरावर आहे. चीनने देखील भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई एसयू 30 जेट फायटरबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले होते.
मार्च महिन्यात राजस्थानमधील बारमेरमध्येही सुखोई ३० हे लढाई विमान कोसळले होते. या घटनेत तीन ग्रामस्थ जखमी झाले होते. हवाई दलाच्या ताफ्यातील सात सुखोई ३० विमानांचा आत्तापर्यंत अपघात झाला आहे.