नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभेत गुरुवारी निवेदन करताना एअर इंडियाने आपल्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला.ते म्हणाले की, २३ मार्च रोजी संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने मी निघालो. बिझिनेस क्लास तिकिटांचे भाडे आकारून आपणास पूर्वसूचनेशिवाय इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. मागणी करूनही तक्रार पुस्तक देण्यात आले नाही. दिल्ली विमानतळावर आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत मी विमानातून उतरणार नाही, असे मी सांगितल्यानंतर ४५ मिनिटांनी एक अधिकारी आला. तो चढ्या आवाजाने माझ्याशी बोलू लागला.मी शांततेने तुमच्याशी बोलतो आहे, तुम्हीही आवाज खाली करा, असे मी त्याला म्हणालो. नंतर आपण कोण आहात, असे विचारता त्याने, मै एअर इंडिया का बाप हूं, सिक्युरीटी अफसर हूं। असे उत्तर दिले. मी खासदार असल्याचे त्याला सांगताच, एमपी हुआ तो क्या हुआ, तू नरेंद्र मोदी है क्या? असे ओरडत त्याने माझी कॉलर पकडून ढकलण्याचा प्रयत्न केला. संतापाने मीही त्याला ढकलले. त्यावर त्याने मला शिवीगाळही केली, त्याची व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहे. सदर प्रकरणामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असेल तर त्याबद्दल मी संसदेची माफी मागतो; मात्र त्या अधिकाऱ्याची माफी मी कदापि मागणार नाही. मी प्राध्यापक आहे, नम्रता माझ्या स्वभावात आहे. मला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्याच्या आरोपावरून माझ्याविरुद्ध कलम ३0८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्याचा अर्थ मी त्याच्या हत्येचा प्रयत्न केला असा होतो. सर्वांनाच कल्पना आहे की विमानात कोणताही प्रवासी शस्त्रासह प्रवास करू शकत नाही, तरीही हे विचित्र कलम माझ्याविरुद्ध लावण्यात आले, असे गायकवाड यांनी सांगितले. >चौकशी करालोकशाहीच्या या सर्वोच्च सदनात स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी उभा नाही तर लाखो लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीबरोबर विमान कर्मचारी कसा दुर्व्यवहार करतात आणि उलटा खासदारालाच गुन्हेगार ठरवण्याचा कसा डाव रचतात, त्याची कहाणी सांगण्यासाठी उभा आहे, असे सांगून ते म्हणाले की, या घटनाक्रमाची संपूर्ण चौकशी करावी. दोषी अधिकारी तसेच विशेषत: एअर इंडियाचे सीएमडी ज्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय सोशल मीडियावर माझ्यासह सर्व खासदारांची बदनामी केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे.’
मलाच गुन्हेगार ठरवण्याचा एअर इंडियाने रचला डाव
By admin | Published: April 07, 2017 4:05 AM