नवी दिल्ली : एअर इंडियाने आपल्या कॉकपीट आणि केबिन कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४0 टक्के कपात केली असली तरी प्रत्यक्षामध्ये ही कपात ८५ टक्के असल्याचा आरोप पायलट संघटनेने केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या कपातीला तीव्र विरोध होत आहे.
एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने वेतन कपात ४0 टक्के असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्ष प्रभावी वेतन कपात (इफेक्टिव कट) ८५ टक्के असल्याचे पायलटांनी म्हटले आहे. या वेतन कपातीला पायलटांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. विशेषत: वेतन कपात पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास त्यांचा विरोध आहे. एअर इंडियाच्या कार्यकारी पायलटांनी कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांना पत्र लिहून आपला विरोध नोंदविला आहे. पत्रात म्हटले आहे की, आधीच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पूर्वलक्षी प्रभावाने ८५ टक्के कपात करणे चुकीचे आहे.
एअर इंडियाचे मासिक वेतन बिल २३0 कोटी रुपयांचे आहे. वेतन कपातीनंतर ते किती कमी होईल, याची माहिती कंपनीने दिली नाही.एअर इंडियाच्या महाव्यवस्थापक मीनाक्षी कश्यप यांनी यासंबंधीचा कार्यालयीन आदेश जारी केला आहे. उड्डयन मंत्रालयाचे निर्देश आणि संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार, कर्मचाºयांचे वेतन व्यवहार्य करण्याचा निर्णय एअर इंडियाच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. सकल मासिक वेतन २५ हजार रुपये असणाºया कर्मचाºयांना मात्र कपातीतून वगळण्यात आले आहे.