नवी दिल्ली- दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे. एअर इंडियाचं बोइंग 777 विमानाला अचानक आग लागली. विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच अॅक्जिलियरी पॉवर युनिटमध्ये आग लागली. विमानाला आग लागली त्यावेळी विमानात कोणताही प्रवासी नव्हता. ही दुर्घटना एअर इंडियाच्या विमान क्रमांक बी777-200एलआरमध्ये झाली आहे.दुर्घटनाग्रस्त विमान दिल्लीहून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होतं. विमान तळावर जेव्हा याची दुरुस्ती सुरू होती. त्यावेळीच विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. विमानाची दुरुस्ती होत असल्यानं त्यावेळी कोणताही प्रवासी त्यात नव्हता. परंतु विमान दुरुस्त झाल्यानंतर लागलीच उड्डाण भरणार होतं. विमानाला आग लागल्याकारणानं त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं. 25 एप्रिलला रवाना होणारं विमान आता गुरुवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान उड्डाण भरणार आहे.