तिरुअनंतपूरमः केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून १२३ जण जखमी झाले आहेत. तर १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. मलप्पुरमच्या एसपींनी याबद्दलची माहिती दिली. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागरी उड्डाण संचलनालयानं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Air India Express Accident)दुबई-कोझिकोड बोईंग ७३७ या विमानात १९१ प्रवासी होते आणि ते संध्याकाळी ७ वाजून ४१ वाजता विमानतळावर दाखल झालं. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरलं. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन जात होतं. या विमानात १९१ जण असल्याचं सांगण्यात येत आहे. वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचं IX-१३४४ विमान प्रवासी घेऊन येत होतं. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना करीपूर विमानतळावर सायंकाळी पावणे आठ वाजता घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स विमानात होते. विमान अपघातग्रस्त झालं, तेव्हा त्यात १९१ प्रवासी होते. विमान अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. डीजीसीएने घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 10:47 PM