मुंबई: केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मुख्य वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियात वैमानिक म्हणून रुजू होण्यापूर्वी साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. (Air India Express Accident)
'एनडीए'तील शिक्षणानंतर ११ जून १९८१ साली ते लष्करी सेवेत दाखल झाले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. विंग कमांडर दिपक साठे ३० जून २००३ मध्ये सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले. अत्यंत हुशार आणि प्रवीण वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती.
केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून १२३ जण जखमी झाले आहेत. तर १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. मलप्पुरमच्या एसपींनी याबद्दलची माहिती दिली. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागरी उड्डाण संचलनालयानं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दुबई-कोझिकोड बोईंग ७३७ या विमानात १९१ प्रवासी होते आणि ते संध्याकाळी ७ वाजून ४१ वाजता विमानतळावर दाखल झालं. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरलं. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन जात होतं. या विमानात १९१ जण असल्याचं सांगण्यात येत आहे. वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचं IX-१३४४ विमान प्रवासी घेऊन येत होतं.