चेन्नई :तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून शारजाहला रवाना होत असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने शुक्रवारी उड्डाण केल्यानंतर काही वेळात तांत्रिक बिघाडामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. सुमारे तीन तास घिरट्या घातल्यावर पायलटने ते सुखरूप विमानतळावर उतरविले व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
तिरुचिरापल्ली विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता घडलेल्या या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी एक बैठक घेतली. विमान उड्डाण करत असताना त्यात बिघाड झाल्याने कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात घेऊन साऱ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश स्टॅलिन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतर विमान सुखरूपरीत्या उतरविल्याबद्दल त्यांनी पायलटचे अभिनंदन केले.
विमानाच्या हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अतिशय कौशल्याने विमान सुखरूपरीत्या विमानतळावर उतरविले. (वृत्तसंस्था)