ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - एअर इंडियाच्या मुख्य वैमानिकाने विमान उड्डाणासाठी सोबत विशिष्ट महिला वैमानिकच हवी असा हट्ट धरल्यामुळे ११० प्रवाशांना तब्बल अडीचतास खोळंबून रहावे लागले. ही घटना बुधवारी घडली. एअर इंडियाचे हे विमान चेन्नईहून मालेला चालले होते.
या एअर इंडियाच्या मुख्य वैमानिकाने मागच्या आठवडयात राजीनामा दिला असून, सध्या तो नोटीस पिरीयडवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मुख्य वैमानिकाने मंगळवारी वेळापत्रक बनवणा-या विभागाला महिला वैमानिकाची बुधवारी त्याच्यासोबत डयुटी लावण्यास सांगितले. वेळापत्रक विभागाने त्याला तुमची मागणी पूर्ण करता येणार नाही असे स्पष्ट केले.
संबंधित महिला वैमानिकाची दिल्लीच्या विमानासाठी डयुटी लावल्याची त्याला माहिती दिली. संबंधित महिला वैमानिकाची आपल्यासोबत डयुटी लावली नाही तर, आजारी पडू अशी धमकी त्याने वेळापत्रक विभागाला दिली.
बुधवारी सकाळी कामावर आल्यानंतर या वैमानिकाने पुन्हा त्याच्या पसंतीच्या महिला वैमानिकाची सोबत डयुटी लावण्यासाठी हट्ट धरला. वैमानिकाच्या या अजब मागणीमुळे उड्डाणाला तब्बल दोन तासांचा विलंब झाला. विमानाची नियोजित उड्डाणाचीवेळ सकाळी सातची होती या विमानाने ९.१३ ला उड्डाण केले.