तेल अवीव : मध्यपूर्वेतील तणावामुळे एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे तत्काळ रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणे बंद राहतील, असे एअरलाइन्सने म्हटले.
इस्रायलदेखीलइराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळाचीही गुरुवारी रात्री बैठक झाली. इराणकडून ड्रोनहल्ला होण्याच्या धोका असल्याने इस्रायलने आपल्या नागरिकांना अन्न आणि पाण्याचा साठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांना अंडरग्राउंड वॉर्डमध्ये हलवण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
आम्ही पलटवार करणार : नेतन्याहूइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ला झाल्यास देश स्वतःचा बचाव करण्यास तसेच पलटवार करण्यास तयार आहे, असे सैनिकांना सांगितले आहे. इस्रायल आणि पाश्चात्य देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनुसार प्रथम हिजबुल्लाह लेबनॉनच्या मदतीने हल्ला करण्याची शक्यता असून, यानंतर इराणकडून इस्रायलवर मोठा हल्ला होणार आहे. अमेरिकेनेही इस्रायलच्या सुरक्षेसाठी भूमध्य समुद्रात आपल्या युद्धनौका, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह क्रूझर आणि विनाशक तैनात केल्या आहेत.