नवी दिल्ली - केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पाहून उड्डाणे रद्द झाल्यास विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत करणार आहेत.
एअर इंडियाने 15 ऑगस्टपर्यंत श्रीनगरला जाणारी तसेच तेथून येणारी सर्व उड्डाणं रद्द अथवा वेळापत्रकात काही बदल झाल्यास (रिशेड्यूल) त्याचे संपूर्ण पैसे प्रवाशांना परत करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया प्रमाणेच विस्तारा एअरलाईन्सने देखीस 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान श्रीनगरसंबंधित असणारी उड्डाणे रिशेड्यूल आणि रद्द केल्यास त्याचे पैसे प्रवाशांना देणार असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच एअर एशिया आणि स्पाईसजेटने देखील प्रवाशांसाठी अशीच घोषणा केली आहे. स्पाईसजेटने 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्टच्या उड्डाणांसंदर्भात ही घोषणा केली आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी आणखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 280 कंपन्या (28 हजार सशस्त्र पोलीस) पाठवल्याने श्रीनगर व संपूर्ण खोऱ्याला लष्करी तळाचे स्वरूप आले आहे. केंद्राने 25 जुलै रोजी 10 हजार सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोऱ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 65 हजार जवान तैनात असून, अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी 20 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या. सशस्त्र दलाचे सुमारे एक लाख पोलीस काश्मीर खोऱ्यात आता असून, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इतके सशस्त्र पोलीस रवाना करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अमरनाथ यात्रेकरू तसेच खोऱ्यात फिरायला आलेले पर्यटक यांनी ताबडतोब तेथून निघावे, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरूही घाबरून गेले असून, तेथून मिळेल त्या मार्गाने जम्मूकडे येण्यासाठी त्यांची घाई सुरू झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचे कारण सांगून त्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्याने आपल्यावर लगेच हल्ले सुरू होतील की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातच अमरनाथच्या मार्गावर पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग व शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिथे प्रचंड घबराट आहे. सरकारने काश्मीर खोऱ्यात इतकी घबराट का निर्माण केली आहे, इतके सशस्त्र सैनिक खोऱ्यात अचानक का पाठवण्यात आले आहेत, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारनेही दिलेले नाही. त्यामुळे तिथे अनेक अफवा पसरल्या आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचे त्रिभाजन करण्याचा सरकारचा विचार असल्याची अफवाही त्यात आहे. काश्मीर खोरे, जम्मू व लडाख असे त्रिभाजन करण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे, असे अनेकांना वाटत आहे.