नवी दिल्ली - एअर इंडिया विमानाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोपावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. एअर इंडियाच्या पायलटने आपल्या सहकारी महिला पायलटचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 5 मे रोजी एअर इंडियाच्या पायलटने माझं शोषण केल्याचा आरोप महिला पायलटने लावला होता.
हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबिरावेळी ही घटना घडली आहे. या महिलेचा आरोप आहे की, ज्यावेळी आम्ही हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबिराला गेलो, ते शिबिर संपल्यानंतर आम्ही दोघं रात्रीचे जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटला जाणार होतो. मी अनेकदा त्याच्यासोबत विमान उड्डाण केले आहे त्यामुळे मला तो सभ्य माणूस वाटला म्हणून मी त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये जाण्यात तयार झाले. रात्री जेवण झाल्यानंतर त्या पायलटने मला त्याच्या जीवनात होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले. वैवाहिक जीवनात त्याला येत असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मला माझ्या पतीला सोडून दे असंही सांगितले. तुला शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागत असतील मग तु काय करतेस असे अश्लिल संवाद माझ्यासोबत केले. त्यामुळे मी त्यांना नकार देत कॅब बोलवून घरी जाण्यासाठी निघाल्याचं महिला पायलटने सांगितले.
दरम्यान, मी घरी पोहचल्यानंतरही त्या सिनिअर पायलटने मला मोबाईलवर मॅसेज पाठवले. वारंवार भेटण्याचा हट्ट करु लागले. मात्र मी नकार दिला त्यानंतर त्यांनी मला माझ्या रुममध्ये येण्याची धमकी दिली. या घडलेल्या प्रकाराची महिला पायलटने तक्रार केल्यामुळे हे प्रकरण समोर आलं. एअर इंडियाने या प्रकरणाची चौकशी करुन जर यात तथ्य आढळलं तर दोषी पायलटवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.