टाटाच्या ताब्यात गेली तरी देखील एअर इंडियाची दुखणी काही कमी झालेली नाहीत. आज अचानक एअर इंडियाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची ७८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. आधीही एअर इंडियामुळे प्रवाशांना त्रास होत होता, आता टाटाकडे आल्यावरही हा त्रास काही कमी झालेला नाहीय.
एअरलाईन्सचे कर्मचारी सामुहिकरित्या आजारी रजेवर गेले आहेत. यामुळे एअर इंडियाला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांनी रजेसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही.
एक्स्प्रेसने सांगितले की, वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवेवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री या आंदोलनाने मोठे स्वरूप घेतले. रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट या मध्य पूर्व आणि गल्फ देशांना जाणाऱ्या आहेत. तसेच अनेक विमानांना विलंबही होत आहे.
एअर इंडियामध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसचे विलिनीकरण केले जाणार आहे. याला कर्मचारी विरोध करत आहेत. दोन्ही एअरलाईनच्या पायलट आणि केबिन क्रूना त्यांची नोकरी जाण्याची भीती वाटत आहे. यावर कंपनीने आपण क्रू मेंबर्सशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.