नवी दिल्ली- एअर इंडियाच्या एक वरिष्ठ वैमानिकानं स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारीनंतर एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाच्या वरिष्ठ वैमानिकानं सहकारी वैमानिकाला कमीत कमी दोनदा विमानात कथित स्वरूपात कु-हाडीनं मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर एअर इंडियानंही त्या वरिष्ठ वैमानिकाला कामावर येण्यास मज्जाव केला आहे. प्रशिक्षक वैमानिकानं कथित स्वरुपात स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिली.सूत्रांच्या माहितीनुसार कोलकाताहून दीमापूर येथे जाणा-या एअर इंडियाच्या 709 या विमानाच्या कॉकपिटमध्ये 18 जानेवारी 2018ला सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणात एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानसेवा देणारी कंपनी गो-एअरच्या वैमानिकानेही दिलेल्या धमकीमुळे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. संबंधित वैमानिकाने दिल्ली-बंगळुरू विमान क्रॅश करण्याची धमकी दिली होती. मात्र, ही घटना केव्हाची आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे गो-एअर प्रशासनाने या वृत्ताचं खंडन केलं होतं. आधीच वैमानिकामुळे विमान उड्डाणाला उशीर झाला होता. थोड्या वेळाने वैमानिक विमानाच्या दिशेने येताना दिसला. वैमानिकाला पाहून काही प्रवाशांनी मोबाइल काढला आणि त्याची शूटिंग करण्यास सुरुवात केली. प्रवासी शूटिंग करत असल्यामुळे वैमानिक चिडला आणि त्याने शूटिंग करण्यास मनाई केली. पण आम्ही शूटिंग करणारच आणि हे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू असं प्रवासी म्हणाले. त्यावर वैमानिकाने धमकी दिली. जर सोशल मीडियात फोटो शेअर केले तर विमान क्रॅश करेल अशी धमकी वैमानिकाने दिली असा दावा प्रवाशाने केला होता. वैमानिकाने दिलेल्या धमकीबाबत त्या प्रवाशांनी विमानातील इतर प्रवाशांना सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी विमानातील वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं होतं.
एअर इंडियाच्या वैमानिकाची सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी, चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 10:36 AM