नवी दिल्ली: विमानाच्या पायलटने त्याच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये घेऊन बसल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. अनेक दिवसानंतर त्या घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (DGCA) ला मिळाली. यानंतर DGCA ने एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
27 फेब्रुवारी रोजी दुबई-दिल्ली विमानात पायलटची मत्रीण इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होती. पायलटने तिला फर्स्ट क्लासमध्ये अपग्रेड करण्यास सांगितले, पण जागा नसल्यामुळे कॅबिन क्रुने त्यास नकार दिला. यानंतर तो मैत्रिणीला घेऊन कॉकपिटमध्ये बसला. तिच्यासाठी कॉकपिटमध्ये खास व्यवस्था करण्यात आली. यावेळी दोघे दारुही प्यायले.
यानंतर विमानातील एका केबिन क्रू सदस्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे तक्रार दाखल केली. यानंतर एअरलाइन्सचे सीईओ, तसेच सुरक्षा आणि गुणवत्ता कार्यांचे प्रमुख हेन्री डोनोहो यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. DGCA ला घटनेची माहिती वेळेवर न दिल्याबद्दल 21 एप्रिल रोजी एअर इंडियाचे सीईओ आणि फ्लाइट सेफ्टी प्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली.
या घटनेच्या तपासात दिरंगाई होत असल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना 15 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. एअर इंडियाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच डीजीसीएने एअर इंडियाला दुबई-दिल्ली फ्लाइटच्या संपूर्ण क्रूला चौकशी पूर्ण होईपर्यंत काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.