एअर इंडियाच्या न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. हजारो फुटांवर असलेले विमान वाटेतूनच दिल्ली विमानतळाकडे वळविण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमानाची तपासणी केली जात असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. हवेत ३६ हजार फुटांवर असताना हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचे समजले होते. विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन होते. यामुळे खळबळ उडाली होती. सुमारे २०० किमी विमानतळावरच घिरट्या घालून हे इंधन कमी करण्यात आले होते. यानंतर या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले होते. या थरकाप उडविणाऱ्या घटनेनंतर आज त्याच कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याने खळबळ उडाली होती.
एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले होते. सध्या हे विमान आयजीआय विमानतळावर उतरविण्यात आले असून विमानतळाच्या एका बाजुला नेण्यात आले आहे. प्रवासी आणि पायलट, क्रू मेंबर यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या टॉयलेटमध्ये या विमानात बॉ़म्ब असल्याची चिठ्ठी सापडली होती. या विमानात १३५ प्रवासी होते. पायलटने ही बाब एटीसीला सांगितली व थिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर हे विमान उतरविण्यात आले होते. या धमक्या मिळत असल्या तरी विमानात काही बॉम्ब सापडत नसला तरीही कोणतीही रिस्क न घेण्याच्या धोरणामुळे ही तपासणी केली जात असते.