नवी दिल्ली : कोझिकोडे विमान अपघातातील १६ प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसने दिली.एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, पायलट इन कमांड दीपक वसंत साठे यांचे पार्थिव कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत रविवारी नेण्यात आले. सह-वैमानिक ३२ वर्षीय अखिलेश कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी मथुरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिकारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध लोक उपस्थित होते. २०१८ मध्ये अखिलेश यांचा विवाह धौलपूर येथील मेघा यांच्याबरोबर झाला होता. मेघा या गर्भवती आहेत व या पंधरवड्यात त्या बाळाला जन्म देणार आहेत.एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विमान शुक्रवारी रात्री कोझिकोडे विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून ३५ फूट दरीत कोसळले होते. यावेळी विमानात चालक दलाच्या सहा सदस्यांसह १९० जण होते. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला. मृत प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. एअरलाईनने म्हटले आहे की, विमान दुर्घटना तपास ब्युरोने (एएआयबी) विमान सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.
Air India Plane Crash: १६ प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 4:00 AM