तिरुअनंतपूरम : केरळमधील कोझिकोडमधल्या भीषण विमान अपघाताने (Air India Express Crash) देशभरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 14 प्रवाशांना जीवानिशी जावं लागलं आहे. तसेच १२३हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या जखमी प्रवाशांमध्ये एक लहान मुलगी बचावली आहे, सध्या तीच चर्चेचा विषय ठरत आहे. एवढ्या भीषण अपघातामधून तिची आणि पालकांची चुकामूक झाली होती. त्या चिमुकलीला शोधण्यासाठी पोलिसांनी बचावकार्य राबवलं असता अखेर ती सापडली. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातातही तिला काही झालेलं नाही.विमानतळावर अपघातानंतर हरवलेल्या मुलीच्या शोधासाठी पालकांचा जीव कासावीस झाला होता. नंतर काही तासांमध्येच ती आपल्या पालकांकडे पोहोचली आणि सगळ्यांची जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे त्या चिमुकलीचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालेले होते. ती सुखरूप मिळावी यासाठी नेटकऱ्यांनी प्रार्थना केली होती. कोझिकोडेचा विमानतळ ‘टेबलटॉप’ म्हणजे डोंगरमाथ्यावर असलेल्या व धावपट्टीच्या दोन्ही बाजूंस दरी असलेला आहे. येथे धावपट्टीवरून धावताना विमान घसरून मोठा अपघात होण्याचा धोका आहे, असा इशारा हवाई वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ गेली अनेक वर्षे देत आले आहेत. अधिकृत माहितीनुसार शनिवार सायंकाळपर्यंत या अपघातातील मृतांचा आकडा १९ वर पोहोचला.
Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 1:17 PM