नवी दिल्ली- आकाशात विमानाची खिडकी तुटूनही सुदैवानं मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. हवेतच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळल्यानं तीन जण जखमी झालेत. या दुर्घटनेमुळे विमानातल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. अमृतसरवरून दिल्लीला येत असताना एअर इंडियाच्या बोइंग 787 या विमानात हा अपघात घडला. या प्रकारामुळे जवळपास 15 मिनिटे प्रवाशांचा भीतीनं थरकाप उडाला. प्रवाशांनी सीट बेल्ट न बांधल्याची अटकळही बांधली जात असून, सुदैवाने बाहेरची खिडकी तुटली नाही. विशेष म्हणजे या प्रकारामुळे विमानातील ऑक्सिजन मास्कही बाहेर आले. एअर इंडिया प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, चौकशी सुरू आहे.विमानाचं सुखरूप लँडिंग झाल्यानंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. विमान दुर्घटना चौकशी पथकाला या अपघाताची माहिती देण्यात आलीय. आपात्कालीन पथकाने लागलीच बचावकार्य राबवून प्रवाशांना सुखरूप वाचवले. त्यातील तीन प्रवाशांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असंही एअर इंडियाच्या अधिका-यानं सांगितलं.
आकाशातच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळली, तिघांना दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 1:23 PM