ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - एका उंदरामुळे एअर इंडियाचे दिल्लीहून मिलानला निघालेल्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून पुन्हा भारतात परतावे लागले. एअर इंडियाच्या या बेजबाबदार कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असली विमानात उंदिर आढळणे ही जागतिक समस्या आहे असे एअर इंडियाने म्हटले आहे.
एअर इंडियाचे एआय १२३ हे विमान दिल्ली विमानतळावर मिलानच्या दिशेने झेपावले. दोन तासानंतर विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना काही प्रवासी व कॅबिन क्रूमधील सदस्यांना विमानात उंदराचे 'दर्शन' घडले. यानंतर काही काळ विमानात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उंदराने विमानातील वायर खाल्ली तर अनर्थ ओढावू शकतो. यामुळे अखेरीस वैमानिकाने इटलीला जाण्याऐवजी पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला.दिल्ली विमानतळावर विमानाची पाहणी करण्यात आली असून विमानात उंदिर सापडलेला नाही. विमानात औषधाची फवारणी करण्यात आली आहे. विमानात खाद्यपदार्थ आणताना मोठमोठ्या ट्रॉली आणल्या जातात. याच ट्रॉलीमधून उंदिर विमानात दाखल होतात. पण ही समस्या जगातील बहुसंख्य शहरांमध्ये आढळते असे एअर इंडियातील अधिका-यांनी सांगितले. उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाचे लँडिग करावे लागले लागल्याची ही तिसरी घटना आहे.