ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - सहवैमानिकाने जर्मन विंग्जचे विमान मुद्दाम पाडून दीडशे प्रवाशांचा जीव घेतल्यानंतर वैमानिकांचे मानसिक स्वास्थ्य आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये दोन वैमानिकांमध्ये मारहाण झाल्याचे वृत्त आहे. रविवारी संध्याकाळी जयपूरहून दिल्लीला येणा-या एअरबस ए ३२० या विमानाच्या उड्डाणापूर्वीच कॉकपीटमध्ये मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिकादरम्यान वाद झाला. त्यानंतर सह वैमानिकाने मुख्य वैमानिकाला मारहाण केली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणाची तयारी सुरू असताना मुख्य वैमानिकाने सह-वैमानिकाला प्रवाशांची संख्या, इंधनाची माहिती, उड्डाणावेळी विमानाचे वजन आदी महत्वाच्या गोष्टी लिहून घेण्यास सांगितल्या. मात्र त्या सह-वैमानिकाला या गोष्टीचा राग आला आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर सह वैमानिकाने मुख्य वैमानिकाला मारहाण केली.
याप्रकरणाची व्यवस्थित चौकशी करण्यात यावी व सह-वैमानिक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.