नवी दिल्ली : एअर इंडियाची विक्री करण्याचे प्रयत्न भारत सरकारने पुन्हा एकदा सुरू केले आहेत. नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, येत्या काही आठवड्यांत आपले मंत्रालय इच्छुक खरेदीदारांसाठी इरादापत्रे (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) जारी करील.एका पत्रकार परिषदेत पुरी यांनी सांगितले की, विमान वाहतुकीसाठी आपले मंत्रालय केंद्रक संस्था आहे. तथापि, मी निर्गुंतवणुकीचा प्रभारी नाही. एअर इंडिया ही पहिल्या दर्जाची एअरलाईन आहे. तथापि, कंपनीचे खाजगीकरण करणे आवश्यक झाले आहे. कंपनीच्या खाजगीकरणाबद्दल कोणतेही दुमत नाही. एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यास भारतातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगो आणि अबुधाबीची एतिहाद एअरवेज कंपनी इच्छुक असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना भेटले आहेत.पूर्ण हिस्सेदारी विकणारगेल्या वर्षी एअर इंडियाची विक्री करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला होता. कंपनीतील ७६ टक्के हिस्सेदारी विकून २४ टक्के हिस्सेदारी आपल्याकडे कायम ठेवण्याचा तेव्हा सरकारचा मानस होता.तथापि, सरकारचे लोढणे गळ्यात नको म्हणून कोणी खरेदीदारच पुढे आला नव्हता. त्यामुळे आता सरकारने एअर इंडियातील संपूर्ण १०० टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी केली आहे.सिंगापूर आणि लंडन येथे त्यासाठी रोड शो आयोजित करण्यात आले होते. तथापि, त्याला मिळालेला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता.
एअर इंडियाच्या विक्रीसाठी लवकरच निघणार इरादापत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 4:03 AM