नवी दिल्ली : जमिनीवर आणलेली(ग्राउंडेड) सर्व १७ विमाने आॅक्टोबर अखेरपर्यंत पुन्हा सेवेत घेण्याची तयारी एअर इंडियाने चालविली आहे. एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी ही माहिती दिली. दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी नसल्यामुळे ही विमाने सेवेतून काढून टाकण्यात आली होती. ही विमाने चार महिन्यांपासून एक वर्षाच्या काळापर्यंत सेवेबाहेर आहेत.
एअर इंडियाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, सेवाबाह्य असलेल्या सर्व १७ विमानांना आॅक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आठ विमाने तर आॅगस्टपर्यंतच सेवेत येतील. या आठ विमानांपैकी चार विमाने ए२0 जातीची आहेत. एक विमान बी७४७ जातीचे, एक बी ७७७ आणि दोन बी ७८७ जातीची आहेत. उरलेली सर्व नऊ विमाने ए३२0 जातीची असून देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यास त्यांनाही आॅक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा प्रयत्न आहे.
लोहानी यांनी सांगितले की, आम्ही महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठीच सेवेबाहेर असलेल्या विमानांना पुन्हा सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. ही विमाने नव्या मार्गांवर चालविली जातील. ही विमाने लवकरात लवकर उड्डाण भरतील, असा आम्हाला विश्वास आहे.
दरम्यान, एअर इंडियाकडून काही नव्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नागरी उड्डयनमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काही आठवड्यांपूर्वी केली होती. मुंबई-नैरोबी आणि दिल्ली-चेन्नई-बाली या मार्गांवर अनुक्रमे २७ सप्टेंबर आणि २७ आॅक्टोबरपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. पुरी यांनी ३ जुलै रोजी राज्यसभेत सांगितले की, एअर इंडियाची विक्री करण्यास सरकार बांधील आहे. त्याआधी एअर इंडियाला परिचालन दृष्ट्या व्यवहार केले जाईल.