नवी दिल्ली : निर्गुंतवणुकीच्या मार्गावर अग्रस्थानी असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने देशभरातील आपल्या निवडक मालमत्तांची विक्री करण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या असून या विक्रीमधून २०० ते ३०० कोटी रुपये मिळण्याचा कंपनीला विश्वास आहे. यामुळे कंपनीला होत असलेला तोटा काही प्रमाणात भरून काढता येणार आहे.
एअर इंडियाने देशाच्या विविध भागामध्ये असलेल्या आपल्या स्थावर मिळकतींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएसटीसीची मदत घेतली जाणार आहे. एमएसटीसीमार्फत या मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-निविदा मागविल्या जाणार आहेत. ८ जुलैला निविदा खुल्या होणार असून ९ जुलै रोजी त्यांची मुदत संपणार आहे.
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या मालमत्तांच्या लिलावातून एअर इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला २०० ते ३०० कोटी रुपये मिळतील, असा प्राथमिक अंदाज आहे. सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेली ही कंपनी चालविणे ही सरकारला डोकेदुखी ठरल्याने तिची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या मालमत्तांची होणार आहे विक्री...
एअर इंडिया आपल्या विविध मालमत्तांची विक्री करणार आहे, त्यामध्ये मुंबईमधील एक निवासी भूखंड व फ्लॅट, नवी दिल्ली येथील पाच फ्लॅट, बंगळुरू येथील एक निवासी भूखंड आणि कोलकाता येथील चार फ्लॅट या महानगरांमधील मिळकती आहेत. याशिवाय औरंगाबाद येथील बुकिंग ऑफिस व कर्मचारी निवासस्थाने, नाशिकमधील सहा फ्लॅट, नागपूर येथील बुकिंग कार्यालय, भूज येथील एअरलाईन हाऊस व एक निवासी भूखंड, तिरुवनंतपूरम येथील एक भूखंड व मंगलोरमधील दोन फ्लॅट आहेत.