नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेली एअर इंडिया (Air India) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एअर इंडियाकडून काही कर्मचाऱ्यांनी बिनपगारी सुट्टीवर (Leave Without Pay) पाठवण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, आरोग्य यांचा विचार केला जाईल. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना पाच वर्षे बिनपगारी सुट्टी देण्यात येईल.गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक संकटात आहे. त्यात आता कोरोनामुळे झालेल्या नुकसानाची भर पडली आहे. कोरोनाचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या एअर इंडियाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळेच एअर इंडिया आपल्या काही कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणार आहे.आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणं याच प्रयत्नांचा भाग आहे. किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्मचाऱ्याचं आरोग्य, त्याची कार्यक्षमता आणि त्याची गरज यावरून व्यवस्थापन याबद्दलचा विचार करेल.यादी तयार करण्याचं काम सुरूएअर इंडियाच्या मुख्यालयातल्या विभागीय प्रमुखांनी आणि प्रादेशिक कार्यालयातल्या प्रादेशिक संचालकांनी कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन सुरू केलं आहे. आरोग्य, कार्यक्षमता आणि गरज या तीन निकषांचा विचार करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर यादीला संचालकांकडून मंजुरी मिळेल.कोणकोणते निकष लावले जाणार?एअर इंडियाच्या व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाचे निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाचा दर्जा, आरोग्य यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय त्यांनी आतापर्यंत किती सुट्ट्या घेतल्या आहेत, त्यांचं प्रमाण किती, ही बाबदेखील मूल्यांकनादरम्यान विचारात घेतली जाईल. त्यानंतर बिनपगारी सुट्टीवर पाठवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल.
एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 5:55 PM