मुंबई - एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध विमानतळांवर धूळ खात पडून असलेल्या विमानांनाही पुन्हा सेवेमध्ये आणण्यात येणार आहे.
विमानतळांच्या हँगरमध्ये उभ्या असलेल्या विमानांना दुरुस्त करून त्यांना सेवेत आणण्याचा एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटांचा विचार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यात मदत मिळेल. ही विमानं इंजिनाची ओव्हरहॉलिंग नसल्याने किंवा स्पेअर पार्ट्स नसल्याने बंद पडलेली आहेत. यामध्ये नॅरो बॉडीपासून वाइ़डबॉडी असलेल्या विमानांचा समावेश आहे.
एअर इंडिया डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल रूटवर सेवा देणारी प्रमुक कंपनी आहे. अशा परिस्थितीत कंपनीची बंद पडलेली विमानं दुरुस्त झाल्यानंतर सेवा अधिक सुधरू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कंपनीकडे नॅरोबॉडी असलेली २५ विमानं आहेत. तक अनेक बोईंग ७७७ आणि ७८७ विमानांचाही समावेश आहे. सध्या एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या हँगर्समध्ये ८-१० ए३२० विमानांना दुरुस्त करण्यात आले आहे. तर पुढच्या तीन महिन्यांमध्ये अनेक बोईंग ७८७ विमानांना दुरुस्त करून सेवेत आणण्याची कंपनीची योजना आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाचा मालकी हक्क हल्लीच टाटा समुहाने खरेदी केला होता. त्यासाठी टाटा समुहाने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. १९३२ रोजी जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर ६९ वर्षांनी पुन्हा एकदा ही कंपनी टाटा कंपनीच्या ताब्यात आली आहे.