रशियाने सैन्य माघारीचे वारंवार सांगितले जरी असले तरी तसे प्रत्यक्षात दिसत नाहीय. यामुळे भारत सरकारने युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा व मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे याची जबाबदारी नुकतेच खासगीकरण झालेल्या एअर इंडियाकडे देण्यात आली आहे. एअर इंडियाने याची माहिती दिली आहे.
युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना बोरिस्पिल इंटरनॅशनल एयरपोर्टवरून आणण्यात येणार आहे. यासाठी एअर इंडिया सुरुवातीला तीन विमानोड्डाणे करणार आहे. २२, २४ आणि २६ फेब्रुवारीला ही विमाने युक्रेनला जाणार असून याच दिवशी ती परत विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशी परतणार आहेत.
एअर इंडियाची कार्यालये, वेबसाईट आणि कॉल सेंटर, अधिकृत एजंट यांच्याद्वारे तिकीट बुक करण्याचे आवाहन एअर इंडियाने केले आहे. नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने भारत आणि युक्रेनदरम्यान संचलित केली जाणारी उड्डाणांवरील बंदी उठविली आहे. तसेच सीटवरील निर्बंधही हटविले आहेत. याचबरोबर देशातील विमान कंपन्यांना युक्रेनच्या विमानफेऱ्या सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर एअर इंडियाने युक्रेनसाठी तीन विमाने पाठविणार असल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाची कंपनी जरी बदलली असली तरी त्यांच्याकडे आधीच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेतलेले अनेक कर्मचारी आहेत. जर उद्या तशीच परिस्थिती उद्भवली तर त्याचा फायदा एअर इंडियाला होणार आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या मोठ्या संख्येने भारतीयांना भारतात परतायचे आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने बुधवारी सांगितले की अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नजीकच्या भविष्यात आणखी फ्लाइट्सची व्यवस्था करण्याची योजना आहे. दूतावासाने सांगितले होते की, त्यांना अनेक भारतीयांचे फोन येत आहेत ज्यात युक्रेनमधून भारतात विमाने उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना काळजी करू नये आणि भारतात जाण्यासाठी फ्लाइट बुक करण्यास सांगितले आहे.