ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - नवीन वर्षापासून ६१ ते ९० मिनिटांच्या देशांतर्गत फ्लाईट्समध्ये फक्त शाकाहारी अन्नपदार्थ देण्याचा निर्णय एअर इंडिया प्रशासनाने घेतला आहे. येत्या १ जानेवारी पासून हा नियम लागू होणार आहे.
याप्रकरणी एअर इंडिया प्रशासनातर्फे केबिन क्रूसाठी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ' १ जानेवारी २०१६ पासून एअर इडियांच्या देशांतर्गत ( ६१ ते ९० मिनिटे कालावधी) उड्डाण करणा-या विमानांच्या इकॉनॉमी क्लासमध्ये फक्त शाकाहारी जेवण देण्यात येईल. तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणाच्या वेळात उड्डाण करणा-या फ्लाईट्समध्ये चहा किंवा कॉफीचा समावेश नसेल', असे २३ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले असून त्यावर एअर इंडियाचे जनरल मॅनेदर कॅ. डी. एक्स.पेस यांची स्वाक्षरी आहे.
६० ते ९० मिनिटांच्या कालावधीच्या फ्लाईटमध्ये सर्व प्रवाशांना भोजन देण्यासाठी केबिन क्रूकडे अवघ्या ३० ते ४० मिनिटांचा कालावधी असतो. मात्र तेवढ्या कालावधीत प्रत्येक प्रवाशाची ऑर्डर घेण्याइतका वेळ क्रू मेंबर्सकडे नसतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे एका अधिका-याने सांगितले.