नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्ससारखी अवस्था एअर इंडियाची होऊ नये व तिने देशाची सेवा करावी व तेथील कोणाचीही नोकरी जाऊ नये अशी सरकारची इच्छा आहे, असे नागरी उड्डयन मंत्री गजपती राजू यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रियाही सुरू आहे, असे ते म्हणाले. कोणीही बेरोजगार व्हावे अशी कोणाचीही इच्छा नाही. किंग फिशर कंपनीसारखी तिची अवस्था होऊ नये. एअर इंडियाने देशाची, लोकांची सेवा करावी व प्रगती करावी, असे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले.एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचा विषय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे आहे. याबाबत खासदारांसह कोणीही समितीला काही सूचना केल्यास त्यांचे स्वागत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या २८ जून रोजी घेतला. परंतु त्याचे अंतिम स्वरूप काय असेल याचा निर्णय जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे.
एअर इंडियातील कोणाचीही नोकरी जाणार नाही - राजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 4:14 AM