मुंबई: एअर इंडियामधील महिला वैमानिकांची टीम उद्या (९ जानेवारी) नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. उद्या एअर इंडियाची महिला वैमानिकांची टीम जगातील सर्वाधिक अंतर कापणाऱ्या विमानाचं सारथ्य करेल. सॅन फ्रान्सिकोवरून झेपावणारं हे विमान उत्तर ध्रुवाच्या मार्गानं बंगळुरूला पोहोचेल. हे विमान तब्बल १६ हजार किलोमीटर अंतर कापणार आहे. महिला वैमानिकांची टीम उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.उत्तर ध्रुवावरून विमान उडवणं अतिशय आव्हानात्मक असल्यानं हवाई वाहतूक कंपन्या या मार्गाची जबाबदारी त्यांच्या सर्वात अनुभवी आणि सर्वोत्तम वैमानिकांकडे देतात, अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. यावेळी एअर इंडियानं ही जबाबदारी महिला कॅप्टनकडे दिली आहे. त्या सॅन फ्रान्सिकोवरून उड्डाण करतील. सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण केलेलं हे विमान उत्तर ध्रुवाच्या वरून झेपावत बंगळुरूत उतरेल, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं.एअर इंडियाच्या वैमानिकांच्या टीमचं नेतृत्त्व कॅप्टन झोया अगरवाल करणार आहेत. नव्या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज असून ९ जानेवारीची वाट पाहत असल्याचं अगरवाल म्हणाल्या. 'जगातील अनेकांना उत्तर ध्रुव पाहता येत नाही. कित्येक जण तर नकाशातदेखील कधी उत्तर ध्रुव पाहत नाहीत. त्या मार्गावरून विमान उड्डाण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाची खूप आभारी आहे,' अशा भावना अगरवाल यांनी व्यक्त केल्या.झोया अगरवाल यांच्यासोबत कॅप्टन थनमई पापागरी, आकांक्षा सोनावणे आणि शिवानी मन्हास जगातील सर्वाधिक अंतर कापणाऱ्या विमानाचं सारथ्य करून विक्रम रचतील. उत्तर ध्रुवावरून आतापर्यंत अनेक विमानांनी उड्डाण केलं आहे. मात्र विमानातील सर्व कॅप्टन्स महिला असलेल्या एकाही टीमनं आतापर्यंत ही कामगिरी केलेली नाही. त्यामुळे अगरवाल यांच्या नेतृत्त्वाखालील टीमच्या कामगिरीची नोंद इतिहासात होईल.
आतापर्यंत कुणालाच जमलं नाही, ते एअर इंडिया करून दाखवणार; महिला पायलट्स इतिहास रचणार
By कुणाल गवाणकर | Published: January 08, 2021 7:39 PM