ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनमार्गे नेवार्कला जाणा-या विमानाचा संपर्क तुटला होता. युरोपीय देश हंगेरीच्या हवाई क्षेत्रात असताना एअर इंडियाच्या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत अचानक संपर्क तुटला होता. मात्र, आता लंडनच्या हीथ्रो विमानतळावर विमानानं सुरक्षित लॅंडिंग केल्याचं वृत्त मिळत आहे.
संपर्क तुटल्यानंतर विमानाचा शोध घेण्यासाठी हंगेरीहून दोन फायटर जेटने उड्डाण भरलं होतं, त्यानंतर हे विमान लंडनच्या हीथ्रो विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आलं. या विमानात 231 प्रवासी आणि 18 क्रू मेंबर होते. 'फ्रीक्वेंसी फ्लक्चुएशन'मुळे विमानाचा संपर्क तुटला होता अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
सकाळी 7 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून या विमानाने उड्डाण भरलं होतं त्यानंतर लंडनमध्ये 11.05(स्थानिक वेळेनुसार) विमान सुरक्षित उतरवण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी जर्मनीच्या एअरस्पेसमध्येही अशीच घटना घडली होती. जेट एअरवेजच्या एका विमानाचा एटीशीशी असलेला संपर्क तुटला होता. यानंतर, तातडीने कारवाई करत हे विमान हीथ्रो विमानतळावर सुखरुप उतरवण्यात आले होते.
प्रकरणाची होणार चौकशी