तामिळनाडू - चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बिबट्याचा बछडा सापडल्याची घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला आहे. या प्रकरणी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे तर चेन्नईतील अन्ना झुऑलॉजिकल पार्कमध्ये बछड्याला सोडण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर असलेला एक प्रवासी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवत बॅग घेऊन विमानतळाबाहेर जात होता. मात्र त्याच्या काही हालचाली संशयास्पद वाटल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता एका महिन्यांचा बिबट्याचा बछडा सापडला. बछड्याला ताब्यात घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला दूध पाजले. चेन्नईतील वाइल्डलाइफ सेंटरमध्ये बछड्याचे मेडिकल चेकअप करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. प्रवाशाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याची चौकशी केली जात आहे.