पहिल्या पाच टप्प्यांतच केंद्रात सत्ता स्थापन करण्याचा आकडा गाठला असल्याचा दावा करतानाच गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिन्याभरापासून विरोधकांची हवा तयार झाल्याची कबुली दिली आहे. तसेच पहिल्या सहा टप्प्यांत भाजपाला ३०० ते ३१० जागा मिळत असल्याचा दावाही शाह यांनी केला आहे.
कोणत्याही देशासाठी जनतेचा सामुहिक आत्मविश्वास हे राष्ट्राच्या विकासाचे कारण असते. 130 कोटी लोकांचा सामुहिक संकल्प देखील असतो. आणि मोदीजींनी अमृत महोत्सवाची रचना करून या दोन्ही गोष्टींचा फायदा करून घेतला आहे. पुढील 30 वर्षात मोठी होणारी सर्व मुले हे करू शकतात असा दृढ निश्चय आणि आत्मविश्वास आहे. माझ्या मते ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे, असे शाह म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात ज्या मतदारसंघात निवडणुका झाल्या त्याचा निकाल आमच्यासाठी चांगला असेल. तसेच पहिल्या दोन टप्प्यांतील निकालही आमच्यासाठी मोठा असेल, असेही शाह म्हणाले. मला वाटतं, मीडियाचा एक मोठा वर्ग अजूनही आम्हाला स्वीकारत नाहीय. विचारधारा नसलेला राजकीय नेता नसावा आणि विचारधारा असलेला पत्रकार नसावा, परंतु त्याच्या उलट घडत आहे. पत्रकार हे विचारधारा असलेले आणि नेते ते विचारधारा नसलेले आहेत, असा दावाही शाह यांनी केला.
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदावरून पायऊतार होताना 4 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधांचे बजेट दिले होते. मोदींनी ते 11.80 लाख कोटींपर्यंत वाढवले आहे. अशा खर्चातून रोजगार निर्माण होतील. विमानतळ ७५ वरून १५० वर गेले आहेत. रस्ते बनवण्याचा वेग आम्ही वाढविला आहे. यातून रोजगार निर्मिती होत नाही का, असा सवालही शाह यांनी विचारला आहे.
राहुल गांधींच्या पक्षातील एन्ट्रीनंतर काँग्रेसची वागणूक बदलली आहे. त्यानंतर राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असा आरोप शाह यांनी केला.
विरोधकांची हवा वाटतेय...ताकदवर विरोधक नसल्याने यंदाची लोकसभा निवडणूक कंटाळवाणी होईल असे वाटत होते. परंतु गेल्या महिन्यापासून विरोधकांची हवा असल्याचे दिसत आहे. विरोधक जोरदार लढा देत आहेत, अशी कबुलीही शाह यांनी दिली.