नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदुषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ही आता आणखी खालावली आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदुषणात मोठी वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. दिवाळीत प्रदूषणकारीफटाके वाजवण्यावर बंदी घातली होती मात्र तरीही दिल्लीमध्ये प्रदूषण करणारे फटाके हे अनेक ठिकाणी फोडण्यात आले. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरात प्रदुषणामुळे (Delhi-NCR Pollution) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्ण बंदी घातलेली असली तरी लोकांनी फटक्यांसह धुमधडाक्यात दिवाळी साजरी केल्याचं पाहायला मिळालं. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. रस्त्यावर लोक फटाके फोडताना दिसले. दिवाळीनंतर शुक्रवारी सकाळी संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) हवेची पातळी गंभीर श्रेणीत पोहोचली. दिल्लीच्या जनपथ भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘धोकादायक’ श्रेणीत पोहोचला. आज सकाळी जनपथमध्ये PM 2.5 पातळी 655.07 वर पोहोचली. संपूर्ण दिल्लीचा AQI 446 सह गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबादमध्येही परिस्थिती अत्यंत बिकट होती.
लोकांनी केली घसा खवखवण्याची आणि डोळ्यात पाणी येण्याची तक्रार
नोएडामधील AQI गंभीर श्रेणीत पोहोचला तर गाझियाबादमध्ये तो धोकादायक श्रेणीत पोहोचला. शहरातील अनेक लोकांनी घसा खवखवण्याची आणि डोळ्यात पाणी येण्याची तक्रार केली आहे. .केंद्र सरकारच्या अनुमानानुसार, रविवारी (7 नोव्हेंबर) सकाळपर्यंत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार नाही. तरीही गुणवत्ता सुधारेल आणि पातळी अत्यंत निकृष्ट पातळीवर पोहोचेल. संपूर्ण दिल्लीचा AQI अत्यंत वाईट श्रेणीच्या वरच्या स्तरावर राहिला आणि सतत खालावत चालला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.