नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानची सीमापार करत हवाई दलाच्या विमानांनी बालकोट येथील दहशतवाद्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाने 12 पानांचा अहवाल बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला.
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे संपूर्ण देशातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक केले गेले. या हल्ल्याचे फोटोसह अनेक दस्तावेज पुरावे म्हणून हवाई दलाने केंद्र सरकारला दिले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार 12 पानांच्या या अहवालात हवाई दलाने बालकोटच्या ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले त्या भागाचे फोटो जोडलेले आहेत. बालकोट परिसरातील दहशतवाद्यांचे अड्डे उधवस्त करण्यात हवाई दलाला यश आले. जवळपास 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या ठिकणांवर बॉम्बहल्ला करण्यात आला, तिथे असणाऱ्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे हवाई दलाने सांगितले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मिसाईल्सने अचूक निशाना साधत लक्ष्यभेद केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर संशय निर्माण करण्याचे राजकारण केले जात आहे. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी सांगण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसने केली तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याने भारतातील काही जणांच्या पोटात दुखतंय असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला होता.
भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारला दिलेला एअर स्ट्राईकबाबतचा अहवाल गोपनीय ठेवणार की सार्वजनिक केला जावा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.