श्रीनगर - पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसकोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे.
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने राजौरा जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसकोरी करत हवाई शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र, भारतीय वायू सेनेनं पाकिस्तानच्या विमानावर हल्ला चढवत एक विमान नष्ट केलंय. तर, उर्वरीत दोन विमानांनी आपल्या हद्दीत परतताना भारतीय हद्दीत काही बॉम्बही टाकल्याची माहिती आहे.
पाकिस्तानचे विमान भारताच्या हद्दीत घुसले
पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यानंतर लेह, जम्मू काश्मीर, श्रीनगर, पठाणकोट आणि अमृतसर येथील विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंडीगड आणि श्रीनगर विमानतळ बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, भारतीय सैन्य आणि वायू सेना पाकिस्तानाला जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानचे एक विमान उद्धवस्त केल्याच्या वृत्तालाही दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.