नवी दिल्ली: व्हाइस चीफ एअर मार्शल आर. के. एस. भदौरिया यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. सध्या हवाई दलाचे प्रमुख असलेले बी. एस. धनोआ ३० सप्टेंबरला निवृत्त होतील. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पुढील हवाई दल प्रमुख म्हणून भदौरिया यांच्या नावाची घोषणा केली आहे.
आर. के. एस. भदौरिया यांनी मे महिन्यात व्हाइस चीफ म्हणून पदभार स्वीकारला. भदौरिया १५ जून १९८० पासून हवाई दलाच्या सेवेत आहेत. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. लवकरच भारतीय हवाई दलात दाखल होणाऱ्या राफेल विमानाचं उड्डाणदेखील त्यांनी केलं आहे. भदौरिया यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि वायू सेना पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे.
सध्या हवाई दल प्रमुख असलेले धनोआ काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचं एफ-१६ विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसोबत दिसले होते. धनोआ यांनी अभिनंदन यांच्यासोबत मिग-२१ विमानानं उड्डाण केलं होतं. मिग-२१ मधून केलेलं हे माझ्या कारकिर्दीतलं शेवटचं उड्डाण असल्याचं त्यावेळी धनोआ म्हणाले होते.