कोलकाता- कोणतंही कारण न देता विमानातून बाहेर पडण्याचे आदेश मानण्यास नकार दिल्यावर प्रवाशांना त्रास देण्यासाठी एअर एशियाच्या वैमानिकाने विचित्र मार्ग वापरला आहे. या वैमानिकाने पूर्ण क्षमतेने एसी सुरु करुन प्रवाशांना गारठवण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानात धुक्यासारखे वातावरण तयार झाले आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
कोलकाता ते बागडोगरा या प्रवासासाठी एअर एशियाचे विमान सज्ज झाले, प्रवासीही आतमध्ये बसले. मात्र अचानक कोणतेही कारण न देता एअर एशियाने विमान 30 मिनिटे उशिरा उडेल असे सांगितले. तसेच दीड तास प्रवासी आतच बसून राहिले. त्यानंतर या प्रवाशांना कोणतेही कारण न देता बाहेर जाण्यास वैमानिकाने सांगितले. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे प्रवाशांनी उतरण्यास नकार दिला. तरीही वैमानिकाने आपला आग्रह कायम ठेवला. प्रवाशी बाहेर जात नाहीत असे दिसताच वैमानिकाने वातानुकूलन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरु केली. यामुळे विमानामध्ये धुक्यासारखे वातावरण तयार झाले. लहान मुले रडू लागली तर अनेक महिलांना उलटीसारखे त्रास सुरु झाले. इंडियन ऑइल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक (पश्चिम बंगाल) दीपंकर रे या विमानात होते. त्यांनी फेसबूक यांसदर्भात सर्व माहिती प्रसिद्ध केली असून एअर एशियाचे कर्मचारी आम्हा सर्वांशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले असे त्यांनी लिहिले आहे.पहिल्यांदा विमानातून बाहेर आल्यावर आमच्या खाण्या-पिण्याची कोणतीही सोय एअर एशियाने केली नाही असे सांगत रे यांनी फूड मॉलवर आम्हाला स्वतःचे पैसे खर्च करुन खाणे विकत घ्यावे लागल्याचे सांगितले. नंतर पुन्हा विमानात चढताना आम्हाला पाण्याची 250 मिलीची बाटली आणि एक सँडविच दिल्याचे सांगितले. एअर एशियाच्या कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या वादावादीचा व्हीडिओही त्यांनी फेसबूकवर प्रसिद्ध केला आहे. एअर एशियाने तांत्रिक कारणांमुळे विमानाचे उड्डाण होण्यास साडेचार तास विलंब झाल्याचे स्पष्ट केले असून प्रवाशांची सुरक्षा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. आर्द्र हवामानात एसी पूर्ण क्षमतेने सुरु केल्यास अशी स्थिती उद्भवते असे सांगत आपली जबाबदारी झटकली आहे.