नवी दिल्ली : विमान कर्मचारी, एअरपोर्टवरील कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन कराल किंवा विमानाला इजा पोहोचेल अशी कृती कराल, तर यापुढे दोन वर्षे तुमच्या विमान प्रवासावर बंदी आणली जाणार आहे.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवासात गैरवर्तन करणा-यांना चाप लावण्यासाठी नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षे बंदी अशा तीन प्रकारच्या शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.विमान वाहतूक राज्यमंत्री अशोक गजपती राजू यांनी यासंबंधी तीन टिष्ट्वट केले आहेत. तीन टिष्ट्वटमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कालावधीच्या बंदीची शिक्षेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्रवाशाने असभ्य वर्तन केल्यास, शिवीगाळ केल्यास, मद्यपान करून गोंधळ घातल्यास तीन महिन्यांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते. तसेच कर्मचाºयाला धक्काबुक्की करणे, मारणे यासाठी सहा महिन्यांपर्यंत बंदी येऊ शकते.एखाद्या कर्मचाºयाला जीवे मारण्याची धमकी दिल्यास, विमानाला इजा पोहोचेल अशी कृत्ये केल्यास किंवा घातपाताचा प्रयत्न केल्यास किमान दोन वर्षे विमान प्रवासाला बंदी घातली जाऊ शकते, असे अशोक गजपती राजू यांनी म्हटले आहे.बिझनेस क्लासलाही लागू-बिझनेस क्लासची सीट न मिळाल्याने एअर इंडियाच्या कर्मचाºयाला मारहाण केल्याच्या आरोपावरून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना विमानबंदी घातली गेली होती. त्यानंतर विमान प्रवाशांवर बंदी आणण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. ही बंदी व्हीआयपी व्यक्तींना नसावी अशीही चर्चा होती. मात्र विमान वाहतूक मंंत्र्यांनी हे नवे नियम सर्वांनाच लागू असतील, असे स्पष्ट केले आहे.
गैरवर्तन केल्यास विमानबंदी, दोन वर्षे बंदीची शिक्षा; नागरी वाहतूक मंत्रालयाची नियमावली जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:48 AM