नवी दिल्ली - एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पतियाळा हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच या आरोपपत्रात एकूण ९ आरोपी बनवण्यात आले असून, त्यात पी. चिदंबमरम यांचे सर्वात वर आहे.
पतियाळा हाऊस कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी तारीख निश्चित केली आहे. आता यावरील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून आज सकाळी थोडा दिलासा मिळाला होता. या प्रकरणात चिदंबरम यांच्या अटकेला न्यायालयाकडून २९ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. दरम्यान, या प्रकरणात चिदंबरम यांना जाणूनबुजून अडकवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ईडी सरकारच्या कब्ज्यात असून, जो सरकारच्या विरोधात बोलतो त्याच्याविरोधात खटला दाखल केला जातो, असा आरोप काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केला आहे.