नवी दिल्ली- माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचे एअरसेल-मॅक्सीस खटल्याच्या नव्या आरोपपत्रात आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सीबीआयने हे नवे आरोपपत्र दाखल केले आहे. पतियाळा हाऊस कोर्टामध्ये सीबीआयने दाखल केलेल्या या आरोपपत्रात पी. चिदम्बरम, त्यांचा मुलगा कार्ती व इतर 16 जणांचे नाव आरोपींच्या यादीमध्ये आहे. इतर आरोपींमध्ये काही सरकारी अधिकारी असून काही अधिकारी निवृत्तही झालेले आहेत. फॉरिन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डने दिलेल्या मंजुरीसंदर्भात आर्थिक व्यवहारांबाबत धागेदोरे सापडल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. याबाबत 31 जुलै रोजी सुनावणी होईल.
कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.