नवी दिल्ली - भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आता आणखी वाढणार आहे. देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (India Made Aircraft Carrier) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. केरळमधील कोची (Kochi) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ही युद्धनौका अत्याधुनिक स्वयंचलित सुविधांयुक्त आहे. भारताच्या सागरी इतिहासात देशात बांधण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे जहाज आहे. भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे नाव या नौकेला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
मोदी स्वावलंबनाचे खंदे समर्थक आहेत. विशेष करून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनावर त्यांचा विशेष भर असून, आयएनएस विक्रांतचे जलावतरण या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल, असे पीएमओने म्हटले आहे. संपूर्णपणे देशात बनविण्यात आलेली ही पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाइन ब्युरोने या युद्धनौकेचे डिझाइन (रचना) तयार केले आहे. INS विक्रांत एअरक्राफ्ट करियर हे समुद्राच्या वर तरंगणारं एक एयरफोर्स स्टेशन आहे जिथून लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोनद्वारे शत्रूंच्या नापाक योजना नष्ट केल्या जाऊ शकतात.
आयएनएस विक्रांतची खासियत
आयएनएस विक्रांतमधून 32 बराक-8 क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. 44,570 टन पेक्षा जास्त वजनाची ही युद्धनौका 30 लढाऊ विमाने सामावून घेण्यास सक्षम आहे आणि दृश्य श्रेणीच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब आणि रॉकेटच्या पलीकडे जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. मिग-29 साठी लूना लँडिंग सिस्टीम आणि सी हॅरियरसाठी DAPS लँडिंग सिस्टीम यांसारख्या विविध विमानांना हाताळण्यासाठी आधुनिक प्रक्षेपण आणि रिकव्हरी सिस्टीमने देखील सुसज्ज आहे.
INS विक्रांतवर 30 एयरक्राफ्ट तैनात करण्यात येणार
INS विक्रांतवर 30 एयरक्राफ्ट तैनात केली जातील, ज्यात 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या, मिग-29 के ('ब्लॅक पँथर') लढाऊ विमाने विक्रांतवर तैनात केली जातील आणि त्यानंतर DRDO आणि HAL द्वारे विकसित केले जाणारे TEDBF म्हणजेच दोन इंजिन डेक बेस्ड फायटर जेट असेल. कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात, याच दरम्यान अमेरिकेची F-18A सुपर होरनेट किंवा फ्रान्सची रफाल (M) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात करण्यात येणार आहेत.